Monday, 2 March 2015

कुटुंबाच्या निर्णयाने दिली जीवनाला कलाटणी...

Anil Dabhade

विदर्भाच्या बुलढाणा जिल्ह्यातील ‘उटी’ हे गाव. घरात आई, वडील, भाऊ आणि दोन बहिणी. दोन्ही बहिणींची लग्न ही गावी असताना झाली. मी दहावीत असताना मोठ्या  भावाचे लग्न झाले. लग्न झाल्यानंतर भाऊ पुण्याला रहायला गेला.

गावी आई-वडिल शेती करतात. शेतीमधून जेमतेम उत्पन्न येत असल्यामुळे घरात सुख-सुविधा उपलब्ध नव्हत्या. घरातली गायी-वासरे यांना चारा चरण्यासाठी न्यायचे काम माझ्याकडे होते. घरात वीजेची सुविधा नसल्यामुळे कंदिलाच्या दिव्यावर शाळेचा अभ्यास करावा लागत असत. सातवीपर्यंतचे शिक्षण गावात पूर्ण केले. त्यानंतर गावापासून सात किलोमीटर असलेल्या जानेफळ गावी दहावीपर्यंतचे शिक्षण घेऊन श्री सरस्वती महाविद्यालयात बारावीपर्यंत शिकलो. घरची परिस्थिती नसताना देखील भावाने मला बाईक घेऊन दिली होती. परंतू त्यामध्ये पेट्रोल भरण्यासाठी देखील पैसे नव्हते. शाळेला सुट्टी असताना, तर कधीतरी शाळेला दांडी मारून विहिरी खोदण्याचे काम करून पैसे मिळवत आणि बाईकमध्ये पेट्रोल भरत. गाडी आणि मित्रांच्या संगतीने घरच्यांना असे वाटले की. ‘मुलगा वाईट वळणावर जात आहे. घरच्यांनी भावाशी बोलून मला पुण्यात पाठवण्याचा निर्णय घेतला.’ या निर्णयाचा मला खूप राग आला होता. मी तेव्हा आई-वडिलांना म्हणालो, तुम्ही मला पुण्याला पाठवता. मी कधीच गावाला येणार नाही.’ सर्व घरच्यांच्या संमतीने मला पुण्यात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.  

कौटुंबिक इच्छने आणि भावाच्या सहकाऱ्याने माझा पुणेरी प्रवास सुरु झाला. भावाचा लाकडी खोके बनवण्याचा व्यवसाय होता.( प्रवासादरम्यान वस्तूंना लागणारे  संरक्षक लाकडी आवरण.)   या  लाकडी खोक्यांचा उपयोग विविध वस्तूंच्या आयात-निर्यातीसाठी केला जातो.  पुण्याला आल्यानंतर सुरुवातीला काही महिने भावाला त्याच्या व्यवसायात मदत केली. भावाने कॉम्प्युटर शिकण्याचा सल्ला दिला. त्यानुसार मी ‘साउथ विंग्ज कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटर’मध्ये प्रवेश घेतला. सकाळी भावाकडचे काम संपल्यावर मी दुपारी दोन तास कॉम्प्युटर क्लासमध्ये जायचो.  बेसिक कॉम्प्युटर कोर्स शिकता शिकता तेथील शिक्षकांशी माझी चांगली ओळख झाली. माझी कौटुंबिक आणि सामाजिक पार्श्वभूमी तेथील शिक्षकांना सांगितली असता, त्यांनी क्लासच्या प्रमुखांशी बोलून मला कॉम्प्युटर क्लासमध्ये नोकरी मिळवून दिली. त्यासोबत त्यांनी माझी राहण्याची व्यवस्था देखील केली.

सुरुवातीला मला साउथ विंग्ज कॉम्प्युटर एज्युकेशन क्लासची माहिती पत्रके (पॅम्प्लेट)वाटण्याचे काम मिळाले. नेहरू नगर, आकुर्डी, बोपोडी, थेरगाव अशा चार ठिकाणच्या क्लासेसची कामे माझ्याकडे होती. माहिती पत्रके वाटण्यासोबतच क्लासची इतर कामेसुद्धा मला सोपवण्यात आली. ही सर्व कामे करण्यासाठी माझ्या सेकंड हँड सायकलने मला मदत केली. मी प्रत्येक ऑफिसची एक ते दीड हजार माहितीपत्रके वेगवेगळ्या ठिकाणी वाटत असे. त्यामध्ये बचत गट, कार्यालये, घरे, वस्ती, मंडळे, इत्यादींचा समावेश होता.

एकदा पावसाळ्यात माहिती पत्रके वाटत असताना क्लासमध्ये एक सद्गृहस्थ मला भेटले, माझी त्यांनी आस्थेने विचारपूस केली आणि ते म्हणाले, ‘तु माहिती पत्रके कधीपर्यंत वाटणार आहेस ? तु कॉम्प्युटरचा चांगला कोर्स कर. तुला व्यवस्थित कॉम्प्युटर आले, तर तु क्लासमध्ये शिकवण्यास सुरुवात कर.’ त्यांच्या या बहुमूल्य मार्गदर्शनामुळे माझ्या मनात उत्साह निर्माण झाला, कॉम्प्युटर शिकल्यामुळे माझ्यामध्ये बदल होईल. असे मला सतत वाटत होते. त्यानंतर कामाव्यतिरिक्त जो वेळ मला मिळत असे, तेव्हा मी क्लासमधल्या मुलांमध्ये जाऊन बसत. कॉम्प्युटरचा बेसिक कोर्स झाला असल्याने मी मुलांना हळू हळू शिकवण्याचा प्रयत्न करत. कॉम्प्युटर क्लासमध्ये शिक्षक कसे शिकवतात, मुलांना शिकवण्याची पद्धत कशी असते, लेक्चरमध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी शिकवल्या जातात, हे मी पाहून-पाहून शिकायला लागलो. मुलांना येणाऱ्या समस्या मी सोडवण्याचा प्रयत्न करत. ज्या समस्या मला सोडवता येत नसे, त्या मी शिक्षकांना विचारून त्यानंतर मुलांना सोडवून दाखवत. हे सर्व करत असताना माझ्यामध्ये अनेक बदल होत गेले. मला योग्य पद्धतीने मुलांना कॉम्प्युटर शिकवता येऊ लागले, मुलांना माझी शिकवण्याची पद्धत देखील आवडत होती. मुलांना शिकवत असल्यामुळे त्यांचा मी ‘सर’ झालो होतो.  

साउथ विंग्ज कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटरच्या मुख्य कार्यालयात मी काम करत असल्यामुळे माझा क्लासमधील विद्यार्थ्यांशी संपर्क वाढला होता. एखाद्या क्लासमध्ये जेव्हा शिक्षक येत नसत, तेव्हा मला त्या क्लासमध्ये शिकवण्याची संधी मिळत. मला जेव्हा ‘मी शिक्षक आहे’ या जबाबदारीची जाणीव झाली, तेव्हा मी स्वत:हून अभ्यास करायला लागलो. अभ्यास करताना काही अडचणी आल्यास मी अनुभवी शिक्षकांकडून समजून घेत. क्लासमधील शिक्षकांचे मला चांगले मार्गदर्शन मिळत. मला दिवसभरात शिक्षकांनी शिकवलेल्या अभ्यासाचा मी रात्रभर सराव करत. त्यानंतर विद्यार्थ्यांना ते क्लासमध्ये शिकवत. विद्यार्थ्यांना शिकवत असताना माझी कॉम्प्युटरच्या अभ्यासक्रमावर मजबूत पकड बसली. क्लासमध्ये शिकवत असताना मी कॉम्प्युटर डिप्लोमाचा कोर्स पूर्ण केला. कालांतराने मला क्लासची जबाबदारी देण्यात आली. ज्या क्लासमध्ये मी माहितीपत्रके वाटण्याचे काम करत होतो, त्याच क्लासचा मी अधिकृत शिक्षक झालो होतो.

कालांतराने मला ‘पुणे इन्स्टीटयूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी क्लास’मध्ये कॉम्प्युटर शिक्षकाची संधी मिळाली. तिथे काही काळ कॉम्प्युटर शिक्षक म्हणून काम केले. हे सर्व होत असताना अनेक समस्या आल्या. राहण्याची सोय नसल्यामुळे क्लासमध्येच रहायचो, कधी-कधी मित्रांकडे राहत असे. जेवणासाठी खिशात पैसे नसल्यामुळे चहा आणि पावावर रात्र मारून न्यायचो. पुण्यापासून गाव पाचशे किलोमीटर असल्यामुळे पैशाअभावी गावी जाऊ शकत नव्हतो. कधी-कधी असे दिवस यायचे की, कुरमुरे खाउन दिवस काढावा लागत असे. यासंबधी मी घरी आई-वडिलांना काहीच सांगितले नाही. कारण घरचीच परिस्थिती हलाखीची होती. त्यामुळे माझ्या परीने मला जमतील तसे दर महिन्याला पगारातील काही रक्कम मी घरी पाठवत असे. 

पुण्यात आपले कोणी नाही याची जाणीव सुरुवातीपासून होती. त्यामुळे नोकरीतून जे पैसे मिळायचे त्यातील काही रक्कम अडचणीसाठी बाजूला काढून ठेवत. माझे प्रत्येक व्यक्तीशी  कौटुंबिक आणि चांगले संबंध होते. मितभाषी, सर्वांशी चांगले बोलणे, कोणाशी कधी भांडण नाही, मनमिळाऊ असा स्वभाव असल्यामुळे मित्र आणि शिक्षकांनी मला बऱ्याच वेळा मदत केली. आजही ते माझ्या आणि मी त्यांच्या संपर्कात आहे.   
     
मी शिकवत असलेल्या क्लासमधील एका विद्यार्थ्याकडून मला प्रथम इन्फोटेक फाउंडेशनच्या सी.आय.टी. (कम्युनिटी इन्फॉर्मेशन ट्रेनिंग) सेंटरची  माहिती मिळाली. सी.आय.टी. सेंटरमधील डी.सी.सी. (डिजीटल कम्युनिटी कनेक्टर) पदासाठी माझी मुलाखत घेण्यात आली. त्यानंतर माझी डी.सी.सी. पदासाठी निवड करण्यात आली. माझे काम पाहून कालांतराने मला माणगावमध्ये ‘स्मार्ट सेंटर’मध्ये प्लेसमेंट को-ओर्डीनेटर म्हणून जबाबदारी देण्यात आली. प्रथम इन्फोटेक फाउंडेशनमध्ये काम करताना माझ्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये अमुलाग्र बदल झाला. प्रथम इन्फोटेक फाउंडेशनमध्ये मला वेगवेगळ्या गोष्टी शिकण्यास मिळाल्या. काम करताना विविध लोकांशी चांगले संपर्क निर्माण करता आले. लोकांशी कसे बोलायचे ? हे मला माहित नव्हते. मी संवाद कौशल्य प्रथम इन्फोटेक फाउंडेशनमध्ये शिकलो. वस्त्यांमध्ये काम करताना लोकांशी सहजतेने बोलायला लागलो. प्लेसमेंट को-ओर्डीनेटर झाल्यापासून कंपन्यांसंदर्भातील कामासाठी वेगवेगळ्या लोकांशी संपर्क साधताना कम्युनिकेशन स्कीलचा फायदा होत गेला.

सुरुवातीला दोन लोक माझ्या समोर आले की त्यांच्याशी काय बोलायचे, हा माझ्यासमोर प्रश्न पडत असे. परंतू आता मी लोकांशी व्यवस्थितरित्या बोलू शकतो. दहा किंवा त्यापेक्षा जास्त लोकांसमोर मी कोणताही मुद्दा पटवून सांगू शकतो. माझ्या राहणीमानात देखील बदल झाला.
मला संस्थेत नवीन संधी मिळाली, तर नक्कीच ती माझ्याकडून स्वीकारली जाईल.

एक गोष्ट सांगायला आवडेल, की प्रथम इन्फोटेक फाउंडेशनमध्ये नोकरी लागल्यावर तिसऱ्याच महिन्यात नवीन बाईक घेतली. सध्या नोकरीत आर्थिक बाजू व्यवस्थित असल्यामुळे घरी मदत करणे शक्य होते. आई-वडिलदेखील खुश असतात. घरी वर्षातून  एकदा जाणे होते, खूपवेळा आई-वडिलांसोबत फोनवर बोलणे होते. भाऊ पुण्यात असल्यामुळे त्याच्याकडे जाणे होते. मी घरी सर्वात लहान असल्यामुळे सर्वजण मला धाकात ठेवत असे. भावासमोर मी कधीच उलट बोलत नाही, तो सांगेल ती पूर्वदिशा मानून मी त्याची अंमलबजावणी करतो. माझ्या मनात भावाविषयी आदरयुक्त भीती आहे.

मला दैनंदिनी(डायरी) लिहिण्याचा छंद आहे. कधी कधी ती वाचताना डोळ्याच्या कडा चटकन ओल्या होतात. कठीण परिस्थितीत साथ देणारे शिक्षक, मित्र-मैत्रिणी, सहकारी यांचा चांगला पाठींबा मिळाला; म्हणून आज चांगले दिवस पाहत आहे.  विदर्भासारख्या खेडे गावातून आलेल्या  ज्या मुलाला कॉम्प्युटर काय आहे हे माहित नव्हतं. तो कॉम्प्युटरचा शिक्षक होतो, वस्तीतील तळागाळातील लोकांसाठी (Grass Root People) काम करून स्वत:च्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करतो. प्रथम इन्फोटेक फाउंडेशनने मला दिलेल्या संधीचा मी योग्य उपयोग केला आणि माझ्या परिश्रमांचा संस्थेला फायदा झाला, याचा आनंद वाटतो. भावाने केलेल्या मार्गदर्शनाचा मला जीवनात खूप फायदा झाला. कधी एकांतात वेळ मिळाला तर माझ्यामध्ये सकारात्मक झालेल्या बदलांचा विचार करतो आणि नवीन शिकण्याचा आणि स्वत:मध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न असतो.
- अनिल दाभाडे, प्रथम इन्फोटेक फाउंडेशन    


“अनिलची कौशल्यपूर्ण शिक्षण देण्याची पद्धत आणि एखाद्याला समजून घेण्याची वृत्ती ही प्रशंसनीय म्हणावी लागेल. धाडसीपणा आणि स्पष्टवक्तेपणा हे गुण अनिलकडे आहेत. त्याला एखादी गोष्ट पटली नाही, तर तो ती न घाबरता समोरच्याला पटवून सांगतो. एखाद्या  अनोळखी व्यक्तीला कोणतेही दडपण न आणता सर्वांमध्ये सामावून घेण्याची कला अनिलमध्ये आहे. नेतृत्वगुण, संवादकौशल्य आणि मार्केटिंग स्कीलच्या जोरावर अनिलने प्रगती केल्याचे जाणवते.”
- मंगेश वानखेडे, अनिलचा मित्र  
      
संकलन आणि शब्दांकन –
विनित शंकर मासावकर