Monday, 1 February 2016

शिक्षक बनण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याने समाधान वाटते. - वैशाली सर्वगोड

Vaishali Sarvagod

लहानपणी वडिलांनी दिलेली शिकवण...काहीतरी बनण्याचे स्वप्न ! हे स्वप्न प्रत्यक्षात आणताना धरलेला तग खूप काही शिकवून जातो. 

नागपूरमधील जरी पटका शहरातील वैशाली सर्वगोड. आई गृहिणी आणि वडील सरकारी नोकरीत होते. वैशाली यांच्या लहानपणी त्यांची कौटुंबिक परिस्थिती नाजूकच होती. वडीलांना सरकारी नोकरी होती. पण वैशालीच्या घरी आठ बहिणी, एक भाऊ,  आई-वडील, आजी-आजोबा अशा १३ कौटुंबिक सदस्यांमध्ये नोकरीला वैशालीचे वडिलच होते. त्यांच्या उत्पन्नावरच घराची आर्थिक नाडी अवलंबून होती.  तिच्या वडिलांना कुठलेही व्यसन नव्हते. तसेच आईने काटकसर करुन संसार उभारला. वडिलांच्या शिकवणीतून आठ बहिणी आणि एक भाऊ स्वत:च्या पायावर उभे राहिले. वैशाली पदवीला असताना तिच्या वडिलांची देवाज्ञा झाली.

वैशाली पहिली ते चौथीपर्यंत महानगरपालिकेच्या शाळेत शिकली. त्यानंतर तिला वडिलांनी मुलींच्या शाळेत घातले. वैशाली शाळेत हुशार. ती विविध स्पर्धांमध्येही भाग घेऊन पारितोषिके मिळवायची. तिने महाविद्यालयीन शिक्षण कला शाखेतून पूर्ण केले. त्यानंतर एम.ए. वैशालीने हिंदी साहित्यातून केले.

नागपूरमध्ये पी.डब्ल्यू.एस. महाविद्यालयात वैशालीला पहिली नोकरी मिळाली. पदव्युत्तरच्या (पोस्ट ग्रॅज्युएशन) विद्यार्थ्यांना हिंदी साहित्य शिकवण्याची संधी तिला मिळाली. वैशालीवर विद्यार्थ्यांना कादंबऱ्या गोष्टीच्या स्वरुपात शिकवण्याची जबाबदारी होती. कॉलेजमध्ये शिकवत असताना विभाग प्रमुखांनी वैशालीमधील कविता लिहिण्याची आवड हेरली. वैशालीने वडिलांवर जी कविता लिहिली होती, ती उत्तर प्रदेशमधील कवी संमेलनात वाचून दाखवण्यात आली. त्यानंतर कवी संमेलनाच्या एका पुस्तकात ती कविता प्रसिद्ध करण्यात आली.  वैशालीने एक वर्ष शिक्षक पदावर काम केले.

त्याच दरम्यान वैशालीचे लग्न झाले आणि ती मुंबईला आली. मुंबईला आल्यावर तिने सोमय्या महाविद्यालयातून २०१०ला बी.एडचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने घरी बाल शिशुपासून ते आठवीतील विद्यार्थ्यांच्या सर्व विषयांचे शिकवणी वर्ग घेण्यास सुरुवात केली. ते शिकवणी  वर्ग अद्यापपर्यंत सुरु आहेत.

नारायण आचार्य शाळेतले शिपाई वैशालीच्या घराच्या शेजारी राहतात.  त्यांना वैशालीची शैक्षणिक पार्श्वभूमी माहित होती. जेव्हा नारायण आचार्य शाळेसाठी प्रथम इन्फोटेक फाउंडेशनमध्ये शिक्षक पदासाठी जागा रिक्त झाली. तेव्हा वैशालीला शिकवण्याबाबत विचारणा करण्यात आली. प्रथम इन्फोटेक फाउंडेशनच्या कार्यालयात जाऊन वैशालीने मुलाखत दिली आणि तिला ऑगस्ट २०११ला नारायण आचार्य शाळेत शिकवण्याची संधी मिळाली.  ‘मला सांगण्यात आले, कि आपल्याला ‘विद्यार्थी गुण संवर्धन कार्यक्रमात’ अप्रगत विद्यार्थ्यांना शिकवायचे आहे. माझ्याकडे शिकवणी वर्गाचा अनुभव होता, म्हणून माझ्यातला आत्मविश्वास वाढला.’ अशा भावना वैशालीने व्यक्त केल्या. वैशालीने सुरुवातीला जेव्हा शिकवायला सुरुवात केली, तेव्हा काही मुलांना मराठीही वाचता येत नव्हते, तर इंग्रजी दूरची गोष्ट होती. वैशालीने काही विद्यार्थ्यांची मुळाक्षरे आणि बाराखडी यांपासून सुरुवात केली आणि त्यांची हळूहळू प्रगती होत गेली. ‘आठवीतल्या मुलांना सुरुवातीला वाटायचे, हे काय आपण शिकत आहे ? परंतू जेव्हा त्यांना वाचायला आले, तेव्हा त्यांना त्याचे महत्व कळले. विद्यार्थ्यांनाही शिकण्यामध्ये आवड निर्माण होत गेली.’ असा अनुभव वैशालीने सांगितला. तिने विद्यार्थ्यांवर घेतलेले परिश्रम इतर शिक्षकांनाही जाणवले. वैशालीने विद्यार्थ्यांमध्ये चार वर्षांत चांगली प्रगती करुन घेतली.

शिक्षक पदावर काम करत असताना वैशाली यांचे इंग्रजी सुधारले. अॅक्टीविटीच्या माध्यमातून शिकवण्याची पद्धत प्रथम इन्फोटेक फाउंडेशनमध्ये आल्यावर त्या शिकल्या. चेंबूरमधल्या जिजामाता नगर येथे कुटुंबासह राहणाऱ्या वैशालीचे पती बीपीसीएल कंपनीत सुपरवायझर आहेत. घरी सासू-सासरे असून मुलगा तिसरीत शिकत आहे.

वडिलांनी लहानपणी वैशालीला जे स्वप्न दाखवले. ते मोठे होऊन शिक्षक बनायचे, स्वप्न वैशालीने वास्तवात आणले.  त्याचे तिला समाधान वाटते.            
    


No comments:

Post a Comment